किती दिवसाचे काळोख , कोटगुलच्या संतप्त नागरिकांचा सवाल? पंधरा दिवसापासून विद्युत वाहिनीचे तारा तुटलेल्याच अवस्थेत

 

 

कोरची

कोरची मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम कोटगुल गावातील काही नागरिक पंधरा दिवसापासून अंधारांमध्येच असून पुन्हा किती दिवस अंधारात राहावे लागणार असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी विद्युत विभागाच्या कर्मचारीला केलेला आहे. एकतर वारंवार विद्युत खंडित होत असल्यामुळे येथील नागरिक आधीच त्रस्त आहेत तर दुसरीकडे पंधरा दिवसांपासून तुटलेल्या विद्युत तारा जोडून विद्युत सुरळीत करत नसल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभारामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे.

पंधरा दिवसापूर्वी मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोटगूल गावातील बस स्टॅन्ड जवळील एका विद्युत खांबाच्या तारावर झाडाची फांदी पडल्यामुळे तारा तुटल्या आणि विद्युत खंडित झाली. तेव्हापासून येथील तुटलेल्या तारा संबंधित विभागातील कर्मचाऱ्याकडून जोडण्यात आलेले नाही त्यामुळे या तारावरील विद्युतावर अवलंबून राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.

या खंडित विद्युत वाहिनीवर खाजगी घरे, सात व्यापाऱ्यांची दुकाने, शासकीय आश्रम शाळा, महसूल मंडळ कार्यालय, टिपागड विद्यालय व बँक आहेत. वारंवार विद्युत विभागाला माहिती देऊन सुद्धा सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. सध्या यापैकी शासकीय आश्रम शाळा व बँकेचे पर्याय व्यवस्था करून विद्युत सुरू करून दिलेली आहे. परंतु शासकीय, निमशासकीय शाळा यांची विद्युत जोडणी केव्हा होणार याची वाट येथील नागरी बघत आहेत.