आरमोरी, 13 ऑक्टोबर 2024 – धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समाविष्ट करण्याच्या हालचालींना विरोध आणि आदिवासी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सुरू असलेल्या डॉ. शिलू चिमूरकर यांच्या आमरण उपोषणाचा सहाव्या दिवशी तब्येत खालावल्याने , गडचिरोली जिल्ह्याचे मा. खासदार नामदेवराव किरासान यांनी उपोषण स्थळाला भेट दिली.
महायुती सरकारवर जोरदार टीका करत, हे सरकार आदिवासीविरोधी असल्याचा आरोप केला. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या शक्यतेबाबत शंका व्यक्त करत, सरकारवर दबाव आणण्यासाठी आदिवासी समाजाने डॉ. शिलु चिमुरकर यांना ठाम पाठिंबा द्यावा आणि हा लढा अधिक मजबूत करावा असे आवाहन केले आहे. खासदार किरसाण यांच्या या भेटीमुळे चिमुरकर यांच्या आंदोलनाला मोठा राजकीय आधार मिळाला असला तरी, गेल्या सहा दिवसापासून प्रशासनाने उपोषण स्थळाची कोणतीही दखल घेतली नसल्याने, आदिवासी समाजातील संताप निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ कार्याध्यक्ष घनश्याम मडावी यांनी उपोषणाची माहिती फोन द्वारे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचवून , पालकमंत्री आणि प्रशासनाने उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.*
गेल्या दोन दिवसात , विविध आदिवासी संघटनांनी उपोषण स्थळाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे यामध्ये , कै. बाबुराव मडावी स्मारक समिती गडचिरोली, आदिवासी ऑल इंडिया एम्पलोयी फेडरेशन गडचिरोली, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, जिल्हा गडचिरोली, आणि ऑल इंडिया आदिवासी एम्पलोयी फेडरेशन शाखा आरमोरी , हलबा- हलबी समाज कर्मचारी महासंघ, जंगोरायताड बहुद्देशीय महिला विकास संस्था गडचिरोली, आदिवासी टायगर सेना , अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांचा समावेश होता.
——————————————–