आरमोरी शहराला सुरळीत वीज पुरवठ्यासाठी १३२ केव्हीचे वीजकेंद्र द्या नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांची महावितरण च्या मुख्य अभियंत्यांकडे मागणी

 

गडचिरोली जिल्ह्यात राजकिय दृष्ट्या अतंत्य महात्वाचे मानल्या गेलेल्या आरमोरी शहराला दरवर्षी पुरेशा विद्युत पुरवठ्या अभावी लोडशेडिंगचा तडाखा सहन करावा लागतो.उन्हाळ्याच्या दिवसात ही स्थिती भयंकर रुप धारण करीत असल्याचे पाहु शहराला आवश्यक त्या प्रमाणात सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी १३२ केव्हीचे वीजकेंद्र देण्याची मागणी आरमोरी नगर परिषदेचे नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांनी गडचिरोली महावितरण वीज कंपनीचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे.
आरमोरी शहराची कुटुंबसख्या 2011 च्या जनगननेनुसार 6049 होती, ती आजमितीस 10 हजाराच्या घरात असुन अनेक राईसमिल,शोरुम,कपड्याचे दुकान असे छोटे मोठे उद्योग धंदे असुन व्यावसायिक व उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अलिकडे कुलरही काम करत नसल्याने एसीचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे.
अशात आरमोरी शहरात मागील अनेक वर्षांपासून 33 केव्हीचेच वीजकेंद्र असुन मागणीच्या प्रमाणात वीजपुरवठा करता येत नसल्याने लोडशेडिंग करून खंडित वीजपुरवठा केल्या जात आहे.अलिकडे शेती व्यवसाय प्रयोजनार्थ व विविध पिकांसाठी उपलब्ध सिंचन सुविधेच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी वीजेचा वापर होत असुन मोठ्या प्रमाणात कृषी पंपाची संख्या वाढल्याने वीजपुरवठ्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. मागणीच्या प्रमाणात वीजपुरवठा अत्यावश्यक असताना 33 केव्ही वीजकेंद्राच्या भरोशावर कमी दाबाचा वीज पुरवठा करण्यात येत असल्याने विद्युत मोटारी जळण्याचा तसेच अनेक महागाडे उपकरणे निकामी ठरण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे.
दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या, कुटुंब संख्या व औद्योगिकरणात वाढ होत असल्याने ही समस्या अधिकच गंभीर होण्याची शक्यता बळावली आहे.ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेता व आरमोरी शहराची वीज पुरवठ्याची मागणी लक्षात घेता या ठिकाणी सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी १३२ केव्हीचे वीजकेंद्र देण्याची मागणी नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांनी गडचिरोली महावितरण वीज कंपनीचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे.याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी काय निर्णय घेतात याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागुन आहे.