शेतकऱ्यांच्या बांधावर बी बियाणे – खते वेळेत पोहचवा- कृषि मंत्री

गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विषयक उपक्रमांचे केले कौतुक

खरीप हंगाम पूर्व बैठकीत जिल्ह्याकडून सादरीकरण

सिरोंचाचा कलेक्टर आंबा जीआय मानांकन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचणार

: येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक बी बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर वेळेत पोहचवा असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले. या खरीप हंगाम पूर्व झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी जिल्ह्याची माहिती सादर केली. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असणाऱ्या कृषीविषयक योजना तसेच नाविन्यपूर्ण स्ट्रॉबेरी, काजू व ड्रॅगन फ्रुट याबाबत प्रधान सचिव तसेच कृषी मंत्री यांनी गडचिरोली जिल्ह्याचे कौतुक केले. या बैठकीला प्रधान सचिव, कृषि विभाग एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी संजय मीणा तसेच इतर जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील खरीप हंगाम व तयारीची माहिती सादर केली. जिल्ह्यात एकूण सिंचनाखालील क्षेत्र हे 67 हजार हेक्टर आहे. सरासरी पेरणी क्षेत्र यात खरीप मधील 1 लक्ष 90 हजार 256 हेक्टर आहे. रब्बी पिके 22927 हेक्टरवर होते. उन्हाळी पिक 9811 हेक्टर घेतले जाते. गेल्या वर्षी 2022-23 मध्ये जिल्ह्यात विविध खरीप पिकांची 2 लाख 10 हजार 183 हेक्टरवर पेरणी झाली होती. यावेळी यामध्ये वाढ करून 2 लाख 25 हजार 890 हेक्टर वर पेरणी करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून ठेवण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी विचारात घेण्यात आलेली पिके यामध्ये भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन व कापूस इत्यादी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रासाठी आवश्यक असणारी बियाणांची गरज ही 37 हजार 485 क्विंटलची आहे. या बियाणांचा स्रोत हा महाबीज व खाजगी पुरवठादारांकडून होणार असून खरीप हंगाम पूर्व याची उपलब्धता करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तसेच यावर्षी खतांचा पुरवठा प्रक्रियेमध्ये जिल्ह्याची मागणी 75 हजार 255 मॅट्रिक टन असून 31 मार्च पर्यंतची शिल्लक ही 12533 मॅट्रिक टन होती. जिल्ह्यातील खताचे आवंटन 54 हजार 670 मेट्रीक टन आहे. खत पुरवठा 2596 मॅट्रिक टन झाला असून खत विक्री ही 764 मे.टन झाली आहे. शिल्लक साठा हा 832 मॅट्रिक टन आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे कट ऑफ होणाऱ्या गावांमध्ये प्रशासनाकडून पावसाळ्यापुर्वी खत व बियाणांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

सिरोंचा येथील कलेक्टर आंब्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार – गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात आढळणारा कलेक्टर आंबा यावेळी जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना भेट म्हणून दिला. यावेळी प्रधान सचिव यांनी या आंब्याचे जीआय मानांकन घेऊन आंब्याची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवावी अशा सूचना कृषी अधिकारी यांना दिल्या. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा व अहेरी या भागात कलेक्टर आंबा या प्रजातीची 800 ते 1000 झाडे असून यातून स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. जी आय मानांकनासाठी कृषी विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर याची विक्री करणे त्यामुळे सोपे जाणार आहे.