कोरची जि.प. शाळेत गोड जेवणाने वाढविली पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी

 

 

कोरची

कोरची येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिल्या वर्गात प्रवेशीत नवागतांचे स्वागत शाळेतील शिक्षकांच्यावतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले. सर्वप्रथम शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. पहिलीच्या भरती पात्र मुलांना दुचाकीवरून शाळेमध्ये आणण्यात आले. शाळेच्या मुख्यद्वारावर पहिलीत प्रवेशीत मुलांना पुष्पगुच्छ व रंगीत टोपी डोक्यावर घालून टिळा लावून आरती ओवाळून उपस्थित पदाधिकायांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. नवीन गणवेश व पुस्तके वितरणही करण्यात आले.

पहिलीत प्रवेशीत २० विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित होते. मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक होती. शाळेतर्फे दुपारून जेवणामध्ये जिलेबी, भात, वरण, भाजी देण्यात आली व दुपारी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले होते. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरविद टेंभूरकर, शिक्षक मारुती अंबादे, महेश कुमार जाडे, शिक्षिका कांता साखरे, प्रमोदिनी काटेंगे, आरती चांदेवार, नव्याने रुजू झालेली शिक्षिका मेघा बुराडे, पालक मुनेश्वर देशमुख, शाळा समिती व्यवस्थापन अध्यक्ष श्रीदेवी शहारे, नंदकिशोर वैरागडे, राहुल अंबादे उपस्थित होते.

पहिल्या वर्गात प्रवेशीत गौरी, टिकी, प्रेरणा आणि पार्थ पहिल्या वर्गामध्ये एकमेकांशी गप्पा मारत बसले असताना त्यांना विचारणा केली. पहिला दिवस कसा वाटतोय तर ते म्हणाले, छान वाटतोय आम्हाला नवीन गणवेश व पुस्तके मिळाली आनंदित झालो. नवीन सर्व बघायला मिळत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पहिलीत प्रवेश केलेल्या भुनेश्वर याला शाळेतून गणवेश मिळाल्यावर त्याने वडिलांना गणवेश देऊन आनंद व्यक्त करत होता. वडील, गणवेश खोलून त्याचा साईज येतो की नाही हे खोलून त्याला दाखवत होते. वडिलांना खूप आनंद झाला. माझा मुलगा पहिलीत गेला. शिक्षणासाठी पहिले पाऊल त्यांनी शाळेत टाकल्यामुळे पालकाचे मन भरून आले.

सुट्ट्यामध्ये घरी करमत नव्हतं. शाळेची आठवण येत होती. शाळेच्या दुपारून सुटीमध्ये आम्ही लपन-छुपी, साखळी, आउट-आउट, बरफ पाणी अशी खेळ खेळत होतो. शाळेमध्ये आल्यानंतर दुपारच्या सुटीत खेळायला भेटणार असल्याने राशी छत्रपती बांगरे या विद्यार्थ्याने आनंद व्यक्त केला. यावेळी पालक उपस्थित होते.