२८ दिवसापासून कोटगुलचे बीएसएनएल सेवा ठप्प; शासकीय ऑनलाईन कामात अडथळा

 

 

कोरची तालुक्यातील कोटगुल येथील बीएसएनएलच्या टॉवरमधील बिघाड दुरुस्त होईना

 

कोरची

कोरची मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर येत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील कोटगूल येथील बीएसएनएल मोबाइल सेवा मागील २८ दिवसांपासून ठप्प पडले आहे. त्यामुळे शासकीय ऑनलाइन कामांमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. तसेच मोबाईल धारक इतर नागरिक कमालीचे त्रस्त झालेले आहेत. कोटगुल येथे शासकीय आश्रम शाळा, पोलीस मदत केंद्र, टिपागड विद्यालय, धनंजय स्मृती विद्यालय, को-ऑपरेटिव्ह बँक, सेतू केंद्र, सेवा केंद्र, तलाठी साजा आहेत. या परिसरातील ३० ते ३५ गावांचे कोटगुल हे मध्यवर्ती केंद्र आहे कोटगुल येथे बीएसएनएलचे टावर मागील २८ दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना कमालीचे त्रास सहन करावा लागत आहे. जन्म मृत्यूची नोंद करण्याकरिता बीएसएनएल चे नंबर असल्यामुळे बीएसएनएल वर ओटीपी येते तेव्हाच ते लॉगिन केले जाते परंतु बीएसएनएलचे टॉवर मागील २८ दिवसापासून बंद असल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण झालेला आहे.

बीएसएनएल सेवा ठप्प झाल्यामुळे इंटरनेटवर चालणारे बँकेच्या सेवा केंद्राचे काम ठप्प झाले आहे तर दर शुक्रवारी या ठिकाणी आठवडी बाजार भरते काही नागरीक आठवडी बाजारात रोकड पैसे घेऊन न येता सेवा केंद्रात जाऊन पैसे काढणार म्हणून येतात परंतु पैसे निघत नसल्यामुळे परिणामी आठवडी बाजार करणे कठीण झाले आहे. शालेय शिक्षणातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन चे दाखले विविध शासकीय कामांमध्ये नागरिकांना अडथळे बीएसएनएल टॉवर २८ दिवसापासून ठप्प झाल्यामुळे त्रास उचलावा लागत आहे. या बीएसएनएल टॉवरचे बिघाड तात्काळ दुरुस्त करून बीएसएनएल सेवा सुरळीत करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.