६ लाख ८० हजार रुपयांच्या दारूच्या बाटलांवर पोलिसांनी फिरवला बुलडोझर 

 

 

कोरची

महाराष्ट्र उत्पादन विभागाने कोरची पोलीस स्टेशन येथील महाराष्ट्र दारू बंदी कायद्याअंतर्गत तब्बल ७ हजार ४९८ हजार दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवून त्यांना नष्ट केले आहे. नष्ट करण्यात आलेल्या दारूच्या बाटलांमध्ये विदेशी दारू, देशी दारू आणि बियरच्या बाटलांचा समावेश होता. ही दारू कोरची पोलिसांनी परिसरातील विविध ठिकाणाहून अवैध विक्री करताना जप्त केली होती.

बुलडोझर फिरवण्यात आलेल्या दारूच्या बाटल्यांमध्ये देशी दारूच्या १८० मिली मापाच्या ४४९ बॉटल, देशी दारूच्या ९० मिली मापाच्या ४ हजार ४७ बॉटल, विदेशी दारूच्या १८० मिली मापाच्या २ हजार ६०९ बॉटल, बिअरच्या ६५० मिली मापाच्या २०२ बॉटल, बिअरच्या ५०० मिली मापाच्या टिनाचे कॅन १३० नग, बिअरच्या ३३० मिली मापाच्या ६१ बॉटल असे एकूण ७ हजार ४९८ हजार दारूच्या बाटलांचा समावेश होता. या सर्व दारूच्या बाटलांची किंमत ६ लाख ८० हजार ४५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राज्य उत्पादक शुल्क दुय्यम निरीक्षक च. वी. भगत यांनी पंचा समक्ष कोरची पोलिसांनी प्रथम दारूच्या बाटला पोलीस स्टेशन परिसरातील मोकळ्या जागेतील रस्त्यावर ठेवल्या आणि नंतर त्याच्यावरून बुलडोझर फिरवून ६ लाख ८० हजार ४५० रुपयांचा माल चक्काचूर करून जेसीबीच्या साहाय्याने १० बाय १० चा खड्डा खोदून दारूच्या बाटलांचा चुरा खड्डयात टाकून नष्ट करण्यात आले.

कोरची पोलिसांनी विविध ४९ अवैध दारू विक्री प्रकरणातील जप्त केलेली दारू बुलडोझरच्या साहायाने नष्ट केली. सन २०११ या वर्षापासून असलेल्या या दारूला अखेर नष्ट करण्यात आले. यावेळी कोरची पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, महिला पोलीस उपनिरीक्षक आशावरी शेडगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार, पोलीस अमलदार हजर होते.