श्रीमती आयुषी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी( भा. प्र. से.) ,जिल्हा परिषद गडचिरोली यांचे हस्ते प्राचार्य साईनाथ अद्दलवार यांचा सत्कार

 

आरमोरी

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत ”मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या स्पर्धात्मक उपक्रमात मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी ही तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून द्वितीय आल्यामुळे विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार यांचा श्रीमती आयुषी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी( भा. प्र. से.) ,जिल्हा परिषद गडचिरोली यांचे हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेद्वारे संचालित महात्मा गांधी महाविद्यालयात आयोजित ‘भारतातील आदिवासी महिला सक्षमीकरण : समस्या, आव्हाने आणि दृष्टीकोन’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र या कार्यक्रमात सदर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. मनोजभाऊ वनमाळी हे होते, उद्घाटक डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विध्यापिठ गडचिरोली हे तर चर्चासत्राचे बीजभाषक श्रीमती आयुषी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी( भा. प्र. से.) ,जिल्हा परिषद गडचिरोली ह्या होत्या. विशेष अतिथी म्हणून श्रीमती पूनम पाटे, उप वन संरक्षक व श्रीमती शुभदाताई देशमुख, सहसमन्वयक ह्या होत्या.
सदर चर्चासत्राचे आयोजन प्राचार्य डॉ लालसिंग खालसा यांनी केले. चर्चासत्राला मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा सुनीताताई वनमाळी, वेणूताई ढवगाये, लक्ष्मीताई मने, मनीषा दोनाडकर, डॉ. प्रियंका शेडमाके या उपस्थित होत्या.
सत्कार करतांना श्रीमती आयुषी सिंग यांनी संपूर्ण शालेय टीम चे अभिनंदन करून भावना व्यक्त केली की, ” एका आदिवासीबहुल तालुक्यातील शाळा तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यातून द्वितीय येणे ही जिल्ह्यासाठी खरोखरच गौरवाची बाब आहे. येथे असलेल्या भौतिक सुविधा व परिसर हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच आहे. विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत राहील असा विश्वास आहे.”