सेवानिवृत्त हातपंप यांत्रिकी चार महिन्यापासून पेन्शनच्या प्रतीक्षेत

सेवानिवृत्त हातपंप यांत्रिकी चार महिन्यापासून पेन्शनच्या प्रतीक्षेत
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण करण्याची मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी
आरमोरी- नोव्हेंबर२०२२ पासून ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत या कालावधीतील चार महिन्यांची हातपंप विभागातील यांत्रिकी व मदतनीस या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन आजतागायत दिली नसल्याने पेंशनधारकांचे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.अनेकदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला विनंती अर्ज दाखल करूनही मुळीच दखल घेतली नसल्याने हातपंप विभागातील सर्व सेवानिवृत्त यांत्रिकी व मदतनीस पेंशनधारकांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेऊन आमरण उपोषणावर बसण्याची परवानगी मिळावी म्हणून निवेदन दिले.
पेंशनधारकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
आम्ही पेन्शनधारक ग्रामीण पाणीपुरवठा यांत्रिकी उपविभाग गडचिरोली या कार्यालयातून हातपंप यांत्रिकी,मदतनीस पदावरून सेवानिवृत्त झालेले असून आम्हा लोकांचे थकीत पेन्शन मिळावे म्हणून अनेकदा उप अभियंता यांत्रिकी जिल्हा परिषद गडचिरोली यांची भेट घेतली असता, बजेट संपले असल्यामुळे सध्या स्थितीत बजेट होईस्तोवर पेन्शन करिता तरतूद वितरित करणे अडचणीचे आहे असे सांगण्यात आले. पेन्शन न मिळाल्यामुळे आम्हा सर्वांचे कुटुंबीयांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे व आर्थिक अडचणी भागविण्याकरिता आम्हाला कर्ज काढून घर संसार चालवावा लागत आहे. आमचे कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास त्यांचे औषधोपचार करण्यास आम्ही असमर्थ झालेलो असून आजारामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मुलाबाळांचे शिक्षण पूर्ण करण्यास अत्यंत अडचण निर्माण होत आहे. आर्थिक अडचणीमुळे मुलांना उच्च शिक्षण देण्यास सुद्धा आम्ही असमर्थ झालेलो आहे अशी बिकट परिस्थिती आम्हा कर्मचाऱ्यावर उडवलेली आहे चार महिन्यापासूनचे पेन्शन थकीत असल्यामुळे व आलेल्या आर्थिक अडचणीमुळे शेवटचा पर्याय म्हणून मरू की जगू अशा परिस्थितीत आमरण उपोषणाचा मार्ग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग गडचिरोली यांच्या दुर्लक्षितपणा व अन्यायकारक कार्यपद्धतीमुळे नाईलाजास्त शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला न्याय मिळावा या उद्देशाने उपोषणाला बसणे आवश्यक झाले आहे त्यामुळे आम्हाला आमरण उपोषणा वर बसण्याची परवानगी देण्यात यावी.
मा.मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन देतेवेळी सेवानिवृत्त कर्मचारी जि. डी. सोमकुवर, एम. जि.बगमारे,ई.टी. शेंडे,एस. ऐन. कुमरे,व्ही.एन. कुकडकर, श्रीमती एम. टी. नैताम,एस.ए. मिस्त्री,एन. व्ही.बांगरे,आर.एम. गरमळे, बी.के.वाघरे, डी. जि. करकाळे, व पि. व्ही. शांतलवार आदी उपस्थित होते.