आरमोरी तालुक्यातील आनंद शिक्षण संस्था, आरमोरी द्वारा संचालित महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव येथे श्री. काशिनाथ विठोबा कांबळे ( परिचर ) हे नियत वयोमानानुसार 29 फेब्रुवारी 2024 ला सेवानिवृत्त झाले. त्याप्रित्यर्थ सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा.श्री. अजय बी. गेडाम हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य श्री. सुरेश चौधरी व शाळेच्या जेष्ठ शिक्षिका कु. शिलाताई वंजारी उपस्थित होते.
चराचरात चैतन्य निर्माण करणारी ज्ञानरुपी शक्ती माता सरस्वती व थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पावन प्रतिमेस वंदन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते श्री. काशिनाथ कांबळे यांचा सपत्निक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना मा.श्री. अजय बी.गेडाम म्हणाले की, माणसाच्या जन्मानंतर त्याला वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून सामाजिक कर्तव्य पार पाडावे लागतात परंतू समय चक्राच्या बंधनामुळे कर्तव्यापासून विमुक्त होणे हे आयुष्याच्या उत्तरार्धासाठी आवश्यक असते. हिच खरी जिवनातील स्थिरता असते. त्यामुळे प्रत्येकाला नियतवयोमानाचे बंधन पाळून निवृत्त व्हावे लागते. निवृत्त कर्मचाऱ्याच्या प्रदिर्घ सेवेचा मागोवा घेऊन प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून निष्ठा आणि कर्तव्य काय असते याचे भान ठेवून संस्था आणि शाळेच्या भरभराटीसाठी सदैव तत्पर असावे असा शाळेतील कर्मचाऱ्यांना मौलिक सल्ला दिला. आणि कर्तव्यदक्ष निवृत्त कर्मचाऱ्याला त्यांनी पुढील सुखकर आरोग्यदायी आयुष्याच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन मकरध्वज वंजारी व आभार प्रदर्शन चेतन बोंद्रे यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.