तालुका युवक कॉंग्रेसची निवेदनातून मागणी
देसाईगंज
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डीएड, बीएड पास झालेले अनेक बेरोजगार विद्यार्थी असून त्यांना मानधन तत्त्वावरील तात्पुरत्या शिक्षक भरती प्रक्रियेत संधी देण्याची मागणी तालुका युवक कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष पंकज चहांदे यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त यांच्या कडे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनातून केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त असल्याने व नविन शिक्षक भरती प्रक्रियेला वेळ असल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर नियुक्त करण्यात येणार असल्याचे शासनपरिपत्रकानुसार सुचित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त जागा भरण्यासाठी शासनाची भूमिका नकारात्मक असल्याने निवृत्त शिक्षक नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुर्ण वेतनावर शिक्षक न भरता 20 हजार रूपये मानधनावार सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना कंत्राटी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करणे हा एक प्रकारचा डीएड, बीएड पास बेरोजगारांवर अन्याय असून एकीकडे लाखो डीएड, बीएड पास बेरोजगार युवक/युवती असताना त्यांना रोजगार द्यायचा सोडून अगोदरच पेन्शन धारक लोकांना शिक्षक म्हणून नेमण्याचा प्रकार म्हणजे या बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. जिल्हा परिषद शाळांमधून गोरगरिबांची लेकरं शिक्षण घेतात त्यांच्या भवितव्याशी शासनाने असे फालतू निर्णय घेऊन खेळू नये.
लाखो युवक- युवती बेरोजगार असतांना त्यांच्या भविष्याचा विचार न करता अंधकारात ढकलण्याचा हा निषेधार्ह निर्णय असून तो रद्द करण्यात यावा. बेरोजगार युवक/युवती उमेदवारांचा रोजगार हिरावून घेणारा आणि गुणवत्ता संवर्धनाच्या कामात अडथळा निर्माण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शिक्षण उध्वस्त करणाऱ्या या निर्णयाचा अनेक समित्या विरोध करीत आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर सेवेत घेण्याचा शासन निर्णय रद्द करून डीएड, बीएड, पास बेरोजगार युवकांना ही संधी देण्यात यावी अशी मागणी देसाईगंज तालुका युवक काँग्रेस कमिटी तर्फे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देसाईगंजच्या तहसीलदार करिश्मा चौधरी यांनी स्वीकारले असून यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदू नरोटे, तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, उपाध्यक्ष देवनाथ सयाम, मचींद्र मातेरे, सचिव आक्रोश शेंडे, महासचिव अमर बगमारे, शहर उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, सोशल मिडीया प्रमुख अरविंद दुपारे, शहर सरचिटणीस ओमकार कामथे, पत्रकार किशोर मेश्राम, नरेश लिंगायत, पंकज नेवारे, राजेंद्र कोडापे, पवन खोब्रागडे, श्रेयस मडावी, आकाश धाकडे, नरेश लिंगायत, रतन डांगे, बंडू मैसकर, आर्यन मेंढे आदी युवक कॉंग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.