अन्यथा बेशरमाची झाडे लावुन कार्यालयासमोर आंदोलन
देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा
देसाईगंज-
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे देसाईगंज- लाखांदुर टी-पाईंट लगतच्या भुमिगत पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचुन असल्याचे आवागमनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे शहरवाशियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहु जाता भुमिगत पुलाखालील साचलेल्या पाण्याचा यथाशिघ्र निचरा करण्यात यावा,अन्यथा घटनास्थळी बेशरमाची झाडे लावुन नगर परिषद कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
देसाईगंज शहर हे येथील रेल्वे स्टेशनमुळे दोन विभागात विभागले गेले असुन एका बाजूला वसाहत तर दुसऱ्या बाजुला दवाखाने,शाळा, काॅलेज,शासकीय कार्यालये, पोलिस स्टेशन असल्याने नागरिकांना पर्यायी मार्ग असलेल्या भुमिगत पुलाखालुन आवागमन करण्यावाचुन पर्याय नाही. विद्यार्थ्यांना शाळा,काॅलेजात हा मार्ग सोयीचा होत असला तरी पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे आवागमन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान पावसाच्या दिवसात भुमिगत पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचुन राहात असल्याने अलिकडे सेंसारयुक्त गाड्या असल्याने जराही काही तांञीक अडचण आल्यास गाड्या बंद पडतात. ऐन पाण्यातुन मार्गक्रमण करीत असताना गाड्या बंद पडत असल्याने संपुर्ण वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करते.यामुळे तासनतास वाहतुकीचा खोळंबा होत असुन वाहनधारकांना प्रचंड आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागते तर पादचाऱ्यांना आवागमन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तथापि निर्माण झालेली समस्या मार्गी लावण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने थातुरमातुर पाणी निचऱ्यासाठी प्रयत्न केला माञ पाणी काढण्यासाठी लावण्यात आलेल्या मशिन्स हटविण्यात आल्याने स्थिती पुर्ववत होऊन पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आवागमनासह वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.ही समस्या यथाशिघ्र सोडवण्याची जबाबदारी नगर परिषदेची असताना नगर प्रशासन मुग गिळुन गप्प असुन याचा जबर फटका माञ नागरिकांना सहन करावा लागत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन पुलाखालील साचलेल्या पाण्याचा यथाशिघ्र निचरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा,अन्यथा पुलाखाली बेशरमाची झाडे लावुन नगर परिषद कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते पिंकु बावणे,जस्सीसिंग बावरी,शुभम तोडकर,अनिल अवचट,आशितोष मोटघरे, जुनैद बनकर यांनी दिला आहे.