गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अतिदुर्गम,अतिसंवेदनशील,आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकरी दऱ्या खोऱ्यांत राहणारे असुन अडाण अशिक्षीत असल्याने शासकीय कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विकासापासुन कोसो दुर असल्याचे पाहु जाता त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात विचारपूर्वक निर्णय घेऊन समस्यांचे निराकरण करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकरी दऱ्या खोऱ्यांत राहणारे असल्याने आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत. अडाण अशिक्षीत असल्याने शेती विषयक,आर्थिक, सामाजिक बाबींपासुन दुर असल्याने शासकीय स्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबात यथायोग्य माहिती नसल्याने अनेक योजनांपासुन वंचित आहेत.गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांशी भाग अतिदुर्गम व अतिसंवेदनशील असल्याने शासकीय कर्मचारी अधिकारी स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याने शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना त्यांना अद्यापही माहितच नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
असे असताना व पिढ्या नं पिढ्या शेती व्यवसायावर जगुन उपजीविका करीत असल्याने शेती विषयक समस्या सोडविणे गरजेचे झाले आहे.यास्तव आदिवासी शेतकऱ्यांना अतिक्रमीत जागेचे पट्टे देताना जागेचा मृद तपासुन ई-पंजी नोंद घेण्यात यावी व पट्टे देण्यात यावे. आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे सातबारा नोंद करण्याचे अधिकार स्थानिक तलाठी किंवा राजस्व निरीक्षक यांना देण्यात यावे.जमिनीची मोजणी फी रद्द करून शक्य तितक्या लवकर मोजणी करून देण्यात यावी,आदी मागण्या दिलेल्या निवेदनातुन केल्या आहेत.याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे लक्ष लागुन आहे.