188 संकटग्रस्त महिला व मुलींना वन स्टॉप सेंटर ने दिला मदतीचा हात

गडचिरोली,(जिमाका)दि.15: जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात केंद्र पुरस्कृत महिला व बाल विकास द्वारा संचालीत सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली द्वारा आतापर्यंत 188 संकटग्रस्त महिला व मुलींना मदतीचा हात देण्यात आले आहे.

सखी वन स्टॉप सेंटर मध्ये एकावेळी पाच महिलांना राहण्याची, भोजन, चहा, नाश्ताची सुविधा आहे. किमान पाच दिवसाचा तात्पुरता निवारा तथा महिलांचे समुपदेशन, न्यायालयीन व पोलीस विषयक मदत, वैद्यकीय मदत अशा अनेक सेवा एका छताखाली देवून कौटूंबिक हिंसाचार, तनाव यासारख्या प्रकरणांचा या सेंटरद्वारा निपटारा करुन त्यांचे कुटूंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ज्या महिलांना व मुलींना पुनर्वसनाची गरज आहे अशांना वन स्टॉप सेंटर द्वारा पुनर्वसीत करण्यात येते. विविध हिंसाचारातील पीडीत मुली व महिला ह्या कधी स्वत:, आई-वडीलांकर्वी तर कधी पोलीस यंत्रणेद्वारा सखी वन स्टॉप सेंटरला दाखल होतात अशा महिला व मुलींना त्या-त्या संदर्भांत आवश्यक समुपदेशन तथा सहाय्य करुन त्यांना पुढील जीवन सुकर करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जातात.

कुमारी मातांची प्रसुती, नको असलेल्या बाळांचे कायदेशीर पुनर्वसन तथा बहूमुल्य समुपदेशन
कुमारी मातांची प्रसुती, पीडीतांना नको असलेल्या बाळांचे कायदेशीर पुनर्वसन, पीडीत मुलांना शाळेत व बाल सुधारगृहात दाखल करणे, मनोरुग्न महिलांचे उपचारार्थ मदत व पुनर्वसन, घरगुती हिंसाचार व मतभेद असणाऱ्या पिडीत महिलांना समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन व पुनर्वसन अशा अनेक जबाबदाऱ्या सखी वन स्टॉप सेंटर च्या माध्यमातुन पार पाडल्या गेल्या.

जिल्हाधिकारी, संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मा. प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनात एका छताखाली अनेक सुविधा सर्व संकटग्रस्त महिलांना उपलब्ध असल्याची माहिती सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार यांनी दिली आहे.
संकटग्रस्त / पीडीत मुली व महिलांच्या मदतीला सदैव तत्पर असणारे सखी वन स्टॉप सेंटर च्या जनजागृती पर कार्यक्रमाच्या माध्यमातून घर, परिवार, समाज, नातेवाईक व अन्य प्रकारे दु:खी महिलांनी सखी वन स्टॉप सेंटर शी संपर्क करावा व मदत घ्यावी असे आवाहन केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार तथा इतर सर्व कर्मचारी वर्गाने केले आहे.

संपर्क कुठे करावा ?
हेल्पलाईन क्रमांक :- 181
कार्यालय :- 07132-295675
केंद्र प्रशासक :- 9637976915
पत्ता :- जुनी धर्मशाळा इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, मुल रोड, कॉम्प्लेक्स,
गडचिरोली