कोरची
जून महिन्यात जावई व मुलाने मारझोड केली. तेव्हापासून पत्नी मुलीकडे राहायला गेली. हा राग मनात धरून पतीने जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून तिची हत्या केली तर प्रतिकार करणाऱ्या मुलीलासुद्धा गंभीर जखमी केले, ही घटना कोरची तालुक्यातील कोचीनारा येथे रविवार २ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता घडली. रेखाबाई प्रीतराम धकाते (४५) असे मृत महिलेचे तर श्यामबाई संजय देवांगण (२७) रा. कोचीनारा असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
रेखाबाई व श्यामबाई ह्या दोघीही शेजारील आशा भक्ता व संगीता बघवा यांच्यासोबत रविवारी सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गावालतच्या जंगलात गेल्या होत्या. तेव्हा आरोपी पती प्रीतराम धकाते (४८) हा त्यांच्यावर पाळत ठेवून होता. हीच संधी साधून प्रीतरामने रेखाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. यावेळी मुलगी श्यामबाई ही प्रतिकार करण्यासाठी गेली. तेव्हा तिच्या डाव्या हातावर व कमरेवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. तसेच पत्नीवर घाव घालणे सुरूच ठेवले. याचवेळी जखमी मुलीने पती संजय देवांगण व भाऊ महेशला फोन करून घटनेबाबत माहिती दिली.
ते येतपर्यंत आरोपी पती प्रीतराम घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेन पसार झाला. यानंतर जखमींना दुचाकीने कोरची ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले; परंतु रेखाबाई हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी श्यामबाई देवांगण हिला गंभीर अवस्थेत गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. ह्या घटनेबाबत कोरची पोलिस स्टेशनमध्ये आरोपी प्रीतराम विरोधात कलम ३०२, ३२६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकवर करीत आहेत.
पत्नी सोबत राहत नसल्याची खुन्नस
जून महिन्यात जावई संजय देवांगण व मुलगा महेश धकाते यांचे आरोपी प्रीतरामशी घरी भांडण झाले होते. यावेळी प्रीतरामला जावई व मुलाने मारझोड केली होती. तेव्हा प्रीतराम हा जखमी होऊन त्याने ब्रह्मपुरी येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतला होता. प्रीतरामने सदर घटनेची तक्रार कोरची पोलिस स्टेशनमध्ये केली होती. तेव्हापासून पत्नी रेखाबाई धकाते गावातीलच जावयाकडे निवासी राहत होती. ती सोबत राहत नसल्याचा राग मनात धरून प्रीतरामने कुन्हाडीने पत्नीची हत्या केली.