कोरची शहरातील मोकाट जनावरांच्या झुंजीत पायाखाली चिरडून तरुणी जखमी, शहरातील मोकाट जनावरांकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

 

 

कोरची

कोरची शहरांमध्ये मागील अनेक महिन्यापासून मोकाट जनावरांचा धुमाकूळ सुरू आहे. या मोकाट जनावरांच्या अचानक झालेल्या झुंजीत एक तरुणी पायाखाली चिरडून जखमी झाली आहे. कु. सुषमा धनराम पोरेटी वय (२५) वर्ष रा. खसोडा ता. कोरची असे जखमी तरुणीचे नाव आहे. ही मुलगी मंगळवारी आरमोरी येथील एम.जी. महाविद्यालयात एम. ए. द्वितीय वर्ष परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी गेली होती. तेथून ती गडचिरोली-कोटगुल बस नी सायंकाळी कोरची ला आल्यानंतर मुख्य बाजार चौकातून आपल्या रूम कडे पायदळ जात असताना गुरुदेव हॉटेल जवळ मोकाट जनावरांच्या झुंजीत येऊन चिरडून जखमी झाली.

मोकाट जनावरांच्या झुंजीत पायाखाली आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व जनावरांना हाकलले परंतु सुषमा जागेवरून उठूच शकत नव्हती तिच्या कमरेला खूप मार लागल्याने शहरातील व्यापारी ईश्वर साखरे, नागरिक राजू भैसारे, प्रशांत कराडे, सोनू मसराम यांनी 108 रुग्णवाहिका बोलावून जखमी सुषमाला रुग्णवाहिकेतुन ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल राऊत यांनी जखमी सुषमावर उपचार सुरू केले परंतु कमरेला मार लागल्यामुळे सकाळी तिचा एक्स-रे करून पुढील उपचार केले जाणार आहे.

जखमी सुषमा पोरेटी ही मूळची खसोडा, कोटगुल येथील रहिवासी अत्यंत गरीब कुटुंबातील असून मागील तीन महिन्यापासून कोरची शहरात किरायाच्या खोलीत कोटगुल येथील प्रियंका बोगा व कोमल कुंभरे या मैत्रीणसोबत राहून एम ए चे शिक्षण सुरू ठेवले आहे तर असे असून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाठी ती कोरची शहरातील वाचनालयात नेहमी अभ्यास करायला जात असायची. परंतु शहरातील मोकाट जनावरांच्या धुमाकूळात सापडून ती जखमी झाली आहे.

कोरची शहरात मोकाट जनावरांच्या कळपामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होऊन अपघात झाले आहे तर अनेक वाहनचालकांना जीव मुठीत ठेवून वाहन चालवावे लागते आहे. नगरपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सदर अपघात घडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे. कोरची शहरातील मुख्य बाजार चौक, तहसील रोडाकडील फवारा चौक, टी पॉइंट वडणावरील चौक व शहरातील वेगवेगळ्या वार्डामधील रस्त्यावर जणूकाही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करित असून गाढ झोपेमध्ये असल्याचे आरोप येथील शिवसेनेचे अध्यक्ष डॉ नरेश देशमुख यांनी केले आहे.