कोरची तालुक्यातील टिपागड पर्यटन-देवस्थानाचा तीन किमी पांदण रस्ता श्रमदानातून केला दुरुस्त

 

कोरची
कोरची तालुका मुख्यालयापासून ५५ किलोमीटर अंतरावर टिपागड पर्यटन व देवस्थान आहे या ठिकाणी जाण्यासाठी न्याहाकल गावापासून टिपागड जाण्यासाठी बरोबर रस्ता नसल्यामुळे या परिसरातील ४० गावातील ५०० ते ६०० नागरिकांनी टिपागड डोंगरावर चढण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रमदानातून पांदन रस्त्याचे दुरुस्तीचे काम रविवारी सकाळ पासून सायंकाळ पर्यत केले आहे. दरवर्षी पावसाळा संपला की या परिसरातील चाळीस गावतील शेकडो नागरिक एकत्र येऊन फेब्रुवारी महिन्यात जत्रा भरण्यापूर्वी या पांदण रस्त्याचे श्रमदानातून दुरुस्तीकरण करतात.
कोरची तालुक्यातील टिपागड निसर्गरम्य पर्यटनस्थळ व देवस्थान नागरिकांसाठी निसर्गातील विलोभनीय स्थळ झाले आहे. टीपागडच्या डोंगर पायथ्याशी न्याहाकल गाव आहे या गावापर्यंत चार चाकी व दुचाकी वाहने जाऊ शकतात. परंतु टीपागड डोंगरावरील निसर्गरम्य तलाव व देवस्थानात जाण्यासाठी तीन किमी डोंगरावर चढावे लागते यासाठी स्थानिक लोकांनी सुरवातीला एक पायवाट रस्ता तयार केला सदर रस्ता पावसाळ्यामध्ये डोंगरावरून पाणी वाहत असल्याने सर्व दगड माती झाडे झुडपे या रस्त्यावर येत असायचे. त्यामुळे पर्यटकांना व भाविकांना या मार्गाने वर चढण्यासाठी खूप अडचण निर्माण होत होती. म्हणून दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी टिपागड समितीचे अध्यक्ष निरिंगशहा मडावी, सचिव मोहन कुरचाम, पुजारी जंतू कुरचाम यांच्या पुढाकाराने चाळीस गावातील नागरिक एकत्र येऊन श्रमदानातून पादन रस्ता तयार करून पर्यटक व भाविकांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे केले जात आहे.
विशेष म्हणजे जमिनीपासून टिपागड डोंगर अंदाजे १५०० मीटर उंच आहे तर डोंगराच्या सभोवताली डोंगर लागून असून मधात तलाव आहे तर येथील निसर्गरम्य तलाव हे ५०० ते ६०० मीटर मध्यस्ती उंचीवर असून विशेषता बारा महिने या तलावात पाणी राहते व हे पाणी गोड असून वर्षभर येथील पाणी आटत नाही. डोंगराच्या वर भुयार असून त्याजवळ आदिवासींचे दैवत गुरुबाबा यांचे मठ आहे तर डोंगर पायथ्याशी गडकुरी माता मंदिर असून त्या मंदिरात पूजा केली जाते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी मोठी जत्रा भरते या जत्रेमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओरिसा राज्यातील मोठ्या प्रमाणात हजारो पर्यटक व भावीक दर्शनासाठी येत असतात.