कोरची – प्रतिनिधी
आदिवासी बहुल असलेल्या कोरची तालुक्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती असून कोरची तालुक्यात मागील दोन दिवसापासून आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. आपल्या अख्ख्या आयुष्याची कमाई शेतावर लावणाऱ्या शेतकऱ्यांची आता हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपले उदरनिर्वाह करावे तरी कसे? असा प्रश्न तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचा मनामध्ये निर्माण होत आहे. कोरची तालुक्यात कुठलेही मोठे उद्योगधंदे नसून शेती हा एकमेव पर्याय असल्यामुळे शेतकरी आपला उदरनिर्वाह या शेतीमुळेच करीत असतात. परंतु अवकाळी पावसाने झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा तालुका काँग्रेस कमिटी कोरचीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा मुख्यमंत्री यांना निवेदनातून तहसीलदार कोरची यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी निवेदन देताना कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, माजी जि प सदस्य रामसुराम काटेंगे,महेश नरोटे,चतुर सिंदराम,सुरेश ऊईके,गिरीश अढभैय्या,तिलक अढभैय्या,चंदरसाय कोल्हे,ईश्वर मलघाटी,भूषण दमगरा,सुभाष ताडामी आदी उपस्थित होते.