दि.- १३/१२/२०२३
“३१ डिसेंबर २०२३ पूर्वी करू किंवा मरू पण विदर्भ राज्य मिळवून राहूच”- अँड. चटप
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची बैठक निर्णायक निर्णय घेण्याकरीता व आंदोलनाची मालिका जाहीर करण्याकरीता दि. ०७.१२.२०२३ रोजी नागपूर येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुख्यालयी झाली व सर्व कोर कमिटीच्या जिल्हा प्रमुखाच्या, महिला आघाडीच्या, जिल्हा समन्वयकाच्या, सर्व पातळीवरील नेत्यांच्या, युवा आघाडीच्या सर्व पदाधिकार्यांच्या व नगर प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडली. समितीने मिशन २०२३ अंतर्गत “विदर्भ मिळवू औंदा” ही घोषणा केल्याप्रमाणे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास घटनेच्या कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला बाध्य करण्याकरीता व निर्णायक लढयाकरीता व संसदेच्या २ जानेवारी पर्यंत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने व संसदेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची घोषणा करावी याकारीता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता सातत्याने आंदोलनाचा रेटा लावणारा दबाव गट म्हणून केंद्र सरकारने निर्णय घ्यावा याकरीता ३ आंदोलनाची मालिका जाहीर केली आहे.
दि. १४.१२.२०२३ रोजी महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील दुर्गम भागातील बोटेकसा या गावाजवळील रस्त्यावर “रस्ता रोको आंदोलन” केले जाणार आहे. हे आंदोलन सकाळी १० वाजता सुरु केले जाणार आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला-वाशीम जुड्या जिल्ह्यात विदर्भ आंदोलनाची धग व लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने व नागरिकांनी विदर्भ आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हावे व ११८ वर्षापासूनची स्वतंत्र विदर्भ राज्याची सुरु असलेली लढाई ४ वर्ष मुंबई राज्यात राहून व ६३ वर्षे मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्यात राहून नागपूर कराराप्रमाणे मराठी भाषिकांच्या राज्यात २३ % लोकसंख्येच्या आधारावर घटनादुरुस्ती करूनही व घटनेला ३७१ (२) हे अभिवचनात्मक कलम जोडूनही १९९४ पर्यंत ३८ वर्षे वैधानिक विकास मंडळ उशिरा निर्माण करून हक्काचा निधी दिला नाही. त्यामुळे विदर्भाचे सिंचनाचे ६० हजार कोटी मिळाले नाही. त्यामुळे १३१ सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होऊन ३५ लाख एकर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही त्यामुळे पूर्वा-उत्तरा नक्षत्राचा पाउस पडला नाही व पिके करपली व अश्या दुष्काळी स्थितीत सक्तीच्या जप्तीची कर्जाच्या वसुलीची नोटीस आल्यावर अमरावती विभाग व वर्धा जिल्ह्यात जग लाजेस्तव शेतकरी आत्महत्या करून मरू लागले व आतापर्यंत १२ वर्षात ३५ हजार चे वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तसेच सामाजिक आर्थिक प्रश्न असलेला नक्षलवादी चळवळ ग्रस्त भागही विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व यवतमाळ ५ जिल्ह्यात व त्यातील ३७ तालुक्यात आहे. २००९ सालच्या निवडणुकीत विदर्भातील ४ आमदार व १ खासदार कमी झालेला आहे. दरवर्षी २००० ते १३००० बालके व गर्भार माता कुपोषणाने मारतात व चंद्रपूर सह विदर्भात प्रदूषणाचे थैमान आहे व विदर्भ आता ओसाड गावांचा अशांत प्रदेश बनला आहे हे सर्व सत्य त्या जिल्ह्यातील जनतेपुढे मांडण्याकरीता अकोला येथे पश्चिम विदर्भाचा “विदर्भ निर्माण संकल्प मेळावा” दि. २०.१२.२०२३ रोजी बुधवारला घेण्याचे निर्धारित केले आहे.
डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात २७.१२.२०२३ ला दुपारी १२ वाजता पासून आमरण उपोषणाला संविधान चौकात विदर्भ आंदोलनातील विराआंसचे नेते एड. वामनराव चटप, दैनिक देशोन्नतीचे प्रमुख संपादक प्रकाश पोहरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजनाताई मामार्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर सह विदर्भातील सर्व प्रमुख सहकारी या आंदोलनात सहभागी होतील व त्याच दिवशी विदर्भातील ११ ही जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
आज दि :- १३.१२.२०२३ विदर्भ राज्य आंदोलन समिती कोरची तालुक्याची बैठक दुपारी १२ वाजता बिहीटेकला गावं येथे बोटेकसा येथे दि :-१४.१२.२०२३ होणाऱ्या “रस्ता रोको आंदोलना” बाबत पूर्व तयारी ची बैठक पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी बैठकीला युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र सिंग ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे पाटील, नागपूर जिल्हा युवा टायगर फोर्स अध्यक्ष पराग वैरागडे, कुरखेडा तालुका अध्यक्ष रामचंद्र रोकडे, शहर अध्यक्ष मुक्ताजी दुर्गे, सोशल मीडिया अध्यक्ष हेमंत कुमार मरकाम, किशोर नरोटे, श्यामलाल गावडे, दिलीप केरामी, कौशल्या काटेंगे, लकेश राऊत, प्रवीण सहारे, मानोराम कुमरे, जगदीश डेहरिया, नेपाल मोरगाये, सरोज सहारे, ज्ञानचंद सहारे, चुनेश्वर मानकर उपस्थित होते.