बेडगाव घाटात हार्वेस्टर उलटले, दरीत कोसळताना थोड़े बचावले 

 

कोरची

धान कापणी व मळणी हंगाम संपवून गावी परतताना हार्वेस्टर बेडगाव घाटात रस्त्यालगत उलटले. झाडाला अडकल्याने हे हार्वेस्टर सुदैवाने २० फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचले, त्यामुळे तिघा जणांना जीवदान मिळाले. २१ डिसेंबरला दुपारी ही घटना घडली.

हरियाणा राज्यातून दरवर्षी धानकापणी व मळणीसाठी छत्तीसगढ़ व महाराष्ट्रात हार्वेस्टर येतात. यंदा हंगाम संपल्यानंतर तिघे जण हार्वेस्टरमधून हरियाणाला परतत होते. दरम्यान कोरची- बेडगाव रस्त्यावरील बेडगावनजीकच्या घाटात शेवटच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर हार्वेस्टर रस्त्यालगत उलटले. समोर २० फूट खोल दरी होती. मात्र, या रस्त्यालगत मोठे झाड आहे, या झाडामुळे हार्वेस्टर दरीत कोसळले नाही. त्यानंतर झाडाच्याच आधाराने तिघेही सुरक्षित बाहेर आले. केवळ दैव बलवत्तर म्हणून तिघेही थोडक्यात बचावले, या तिघांना किरकोळ इजा असून सध्या उपचार सुरू आहेत.

कोरची-बेडगाव रस्त्यावरील घाटात अपघाताची घटना सुरूच आहे. रायपूरपासून ते चंद्रपूरपर्यंत जाणारी वाहने याच रस्त्यावरून धावतात. घाटातील तीव्र चढवरून व उतारावरून अवजड वाहनांचे नियंत्रण सुटते, अनेकदा घाटात ही वाहने बंद पडतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. दुचाकीस्वार व छोट्या वाहनचालकांना या घाटातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.