कोरची
कोरची मुख्यालयापासून ४ किमी अंतरावरील बेडगावच्या गावकऱ्यांनी ८ जानेवारीला रात्री २ वाजता दरम्यान गोवंश घेऊन जाणारी चार ट्रक पकडली. मात्र घटनास्थळावरून गोवंश तस्कर पसार झाले. या चार ट्रकामध्ये १३० गोवंश डांबून कत्तलीसाठी हैद्राबादला नेले जात होते गावकऱ्यांनी हे ट्रक पकडून बेडगाव पोलिसांच्या मदतीने या गोवंशाची सुटका करून जीवनदान दिले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील म्हणून कोरची तालुका असून या तालुक्यात नक्षलदृष्ट्या पोलीस रात्रीच्यावेळी बाहेर पडत नसल्याचे डाव साधून तस्कर गोवंश तस्करी करण्यात यशस्वी होत आहेत. मागील पाच ते सहा दिवसापासून रात्रीच्या दरम्यान गोवंश तस्कर मोठ्या प्रमाणात अनेक ट्रकांमध्ये डांबून गाय, बैलांची तस्करी करत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली होती तस्कर अंधाराचा फायदा घेऊन अनेक दिवसांपासून कोटगुल पोलीस स्टेशन हद्दीच्या कोसमी नं.२ या गावावरून बोरी ते बेडगाव मार्गे सुसाट वेगाने हैद्राबाद कत्तलखान्यात तस्करी सुरू चालु ठेवली आहें.
सोमवारी बेडगाव येथील गावकऱ्यांनी सापळा रचून बोरी ते बेडगाव फाट्यावरील रस्त्याच्या मधोमध बैलबंडी आडवी करून MH 34 BG 4259, MH 34 AV 3086, MH 37 B 1387, AP 29 V 9735 अशा क्रमांकाची चार ट्रके अडवली यावेळी तस्कर वाहन सोडून तर मागे लायनीत असलेली पाच ते सहा ट्रक रिव्हर्स घेऊन पसार झाली. यानंतर गावकरी ट्रकांची पाहणी केली तर अनेक गायी व बैलांच्या पायाला रस्सी बांधून त्यांना डांबली होती याची माहिती तात्काळ बेडगाव पोलिसांना देऊन या चार ट्रकांमधून लाखो रुपये किंमतीचे गोवंशाची सुटका बेडगाव येथील गावकऱ्यांनी पोलिसांमार्फत केली आहे.
सदर ट्रकांमधील सर्व गाई बैलांना सकाळी बेडगाव पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या आवारात खुले सोडण्यात आले यामधील पाच ते सहा गाई डांबून असल्यामुळे मरणाच्या स्थितीत होती. तर बेडगाव पोलीस अवैध गोवंश तस्करी करण्याऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. तर यापूर्वी डिसेंबर महिन्यात कोरची तालुक्यातील सावली गावच्या नागरिकांनी रात्रीच्यावेळी गोवंश तस्करांची दोन ट्रक पकडली होती.
विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेकडील शेवटच्या टोकावर कोरची तालुका असून छत्तीसगड राज्य व गोंदिया जिल्हा सीमेलगत असलेल्या काही गावांच्या जंगलपरिसारात तस्कर मोठ्या प्रमाणात आपली ठिये तयार करून ठेवली असून तिथून दररोज १० ते २० ट्रका जंगल व चोरट्या अशा विविध मार्गानी रात्रीच्या वेळी कत्तलीसाठी हैदराबाद व नागपूरकडे तस्करी करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.