मसेली वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करून हात उचलणे युवकाला भोवले; १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

 

कोरची

कोरची तालुक्यातील मसेली येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करून हात उचलणे युवकाला चांगलेच भावले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र खोबा यांनी कोरची पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. पुरुषोत्तम माधव हलामी २९ वर्ष रा. बोदालदंड ता. कोरची असे आरोपीचे नाव असून कोरची पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी गुन्हा दाखल करत शासकीय कामात अडथळा व मारहाणीचे कलम लावून कायद्यान्वये अटक करून कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

डॉ. नरेंद्र खोबा ३१ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २० जानेवारी रोजी ते कर्तव्यावर असताना दुपारी ४:३० वाजता सुमारास रस्ता अपघातातील जखमी रुग्ण ऋत्विक श्रीराम सयाम २३ वर्षे रा. मसेली याला त्याच्या मित्रांनी दवाखान्यात आणले होते. डॉ. नरेंद्र खोबा यांनी रुग्णाची गंभीर दुखापत बघून रुग्णास रेफर करण्याची कागदपत्रे तयार केली आणि रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णास वाहनात बसवण्यास सांगितले. असता आरोपी पुरुषोत्तम हलामी याने रुग्णास रेफर करण्याची कारवाई बघून डॉ. नरेंद्र खोबा यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, यापूर्वी सुद्धा आरोपी पुरुषोत्तम हलामी यांच्याकडून असाच प्रकार घडला होता. तेव्हा डॉक्टरांनी सामोपचाराने समेट घेतला होता. परंतु यावेळी अतिच प्रकरण घडले त्यामुळे डॉक्टर खुबा यांनी कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोरची पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून कुरखेडा न्यायालयात हजर केले तर न्यायालयाने १३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचे अधिक तपास कोरची पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अशावरी शेडगे हे करीत आहेत.

 

आरोपीवर कठोर कारवाई करा अन्यथा जिल्ह्यातील सर्व डॉक्टर जाणार संपावर – डॉ. सुनील मडावी गडचिरोली

 

प्राथमिक आरोग्य पथकांमध्ये आपत्कालीन सोयी सुविधांचा अभाव असतो कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते अशावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी सहकार्य करणे अनिवार्य असते परंतु आरोपी पुरुषोत्तम हलामी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेंद्र खोबा यांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. याप्रकरणी त्याच्यावर कलम 506, 333, 332 कलमान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा गडचिरोली जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी संपावर जाणार.

 

डॉ. सुनील मडावी

 अध्यक्ष 

महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ जिल्हा संघटना गडचिरोली.