राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे टेमली येथे उदघाटन

 

 

कोरची

येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीराचा उदघाटन सोहळा टेमली येथे दिनांक ३०/०१/२०२४ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून कोरची येथील तहसीलदार प्रशांत गड्डम होते. अध्यक्षस्थानी वनश्री महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मनोज अग्रवाल होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोरची येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथील प्राचार्य उमाकांत ढोक, प्रा. ए. एम. वाटगुरे तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते झाडूराम हलामी, सामाजिक कार्यकर्ते इजामसाय काटेगे, ग्रा.प. टेमली च्या सरपंचा निकाबाई थाट, टेमली गावच्या पोलीस पाटील कवलीबाई हारमे, उपसरपंच धनिराम हिडामी, ग्रा.प.सदस्य देशीरबाई घाटघुमर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष गोपाल सिंगार जी.प. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशाल बंजार, टेमली ग्रा.प. सचिव कैलास कावळे आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्राचार्य उमाकांत ढोक म्हणाले की, युवकांना आपल्या ठिकाणी असलेल्या शक्तीचा वापर कसे करायला पाहिजे याचे सतत भान ठेवले पाहिजे. जीवनामध्ये संधी नेहमीच चालून येत नाही प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करून येणाऱ्या संधीचे विद्यार्थांनी सोनं केले पाहिजे. रासेयोचे तरुण विद्यार्थी देशाचे भावी आधारस्तंभ आहेत आपण जसा विचार कराल तसाच आपला व्यक्तिमत्व घडत जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलतांना कोरचीचे तहसीलदार प्रशांत गड्डम म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना चे ब्रीदवाक्य स्वतःसाठी नाही तर समाजासाठी आपण श्रम केले पाहिजे. विद्यार्थांनी आपले पुस्तकी ज्ञान समाजकार्य करण्यासाठी उपयोगी आणले पाहिजे समाजाचे एक घटक म्हणून समाजाबद्दल आपुलकीची भावना असली पाहिजे. आपल्याजवळ असलेल्या क्षमताचा पुरेपूर वापर करून आपले जीवनमान उंच शिखरावर नेले पाहिजे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमा दरम्यान उपसरपंच धनिराम नैताम, ग्रा प सदस्या देशीरबाई घाटघुमर, झाडूराम हलामी, इजामसाय काटेगे यांनीसुद्धा मार्गदर्शक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी प्राचार्य तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. टी चहारे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रदीप चापले यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. गुलाब बावननथडे यांनी केले. कार्यक्रमाला गावातील बचत गटाचे महिला, पुरुष गटाचे सदस्य, ग्रामस्थ, तरुण मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रासेयो स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.