कोरची तालुक्यातील विविध समस्या संदर्भात तहसीलदारांना निवेदन , प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम
कोरची तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या डॉ. शिलू चीमुरकर यांनी तहसिलदार साहेब, कोरची यांना तालुक्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन सादर केले आहे. जनसंवाद यात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या समस्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, प्रशासनाने आठ दिवसांच्या आत या समस्या सोडवाव्यात; अन्यथा, दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी जन आक्रोश मोर्चा व घेराव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
डॉ. शिलू चीमुरकर यांनी सादर केलेल्या प्रमुख मागण्या:
1. अखंडित वीज पुरवठा:
– संपूर्ण कोरची तालुक्यात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करावा, विशेषतः कृषी व दैनंदिन वापरासाठी.
– लोड शेडिंगच्या कारणांची सखोल चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी.
– पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
– शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा सुनिश्चित करावा.
2. रस्ते आणि पूल दुरुस्ती व बांधकाम:
– टेमली, कोचीनारा, मलयघाट, चरवीदंड, लेकुरबोर्डी, पडयालझोप आणि अन्य गावांतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी व डांबरीकरण करावे.
– मसेली ते चारभट्टी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, ज्यामुळे कुरखेडा जाण्यासाठीचे अंतर 45 किमीवरून 25 किमीपर्यंत कमी होईल.
– बीहटेकला ते कोमरा टोला दरम्यानच्या अपूर्ण पुलाचे बांधकाम पूर्ण करावे.
– कोरची तालुक्यातील सर्व गावांमधील रस्त्यांची आणि पूलांच्या दुरुस्तीची मागणी करणारा आराखडा तयार करून तो शासन दरबारी सादर करावा.
3. आरोग्य सेवा आणि सुविधा सुधारणा:
– बेडगाव येथे नवीन प्राथमिक चिकित्सा केंद्र (PHC) तातडीने स्थापन करावे, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना वेळेवर आरोग्यसेवा मिळू शकेल.
– बोटेकसा PHC ची स्थिती सुधारण्यासाठी मूलभूत सुविधा तातडीने पुरवल्या जाव्यात. सध्याच्या लोकसंख्येनुसार सुसज्ज आरोग्यसेवा केंद्राची उभारणी करावी.
– मसेली, बेतकाठी आणि ग्यारापट्टी येथे PHU आणि कोरची येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून या आरोग्य केंद्रावर महिला डॉक्टर, गायनोलॉजिस्ट आणि सर्जन तातडीने नियुक्त करण्यात यावे.
4. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे:
– कोरची तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती आणि जानमालाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
– तालुक्यातील कृषी केंद्राकडून युरिया पुरवठ्याची कमतरता सांगून, 250 रुपयांची युरिया पाचशे रुपयांना विकली जाते. शिवाय, एका युरियाच्या बॅगसोबत लिक्विड युरिया घेणे बंधनकारक केले जात आहे , अशी तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे, या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.
– नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ‘ई-पिक’ प्रक्रिया सुलभ केली जावी व त्यासाठी गावपातळीवर नेटवर्क सुलभ केले जावे.
5. पाणीपुरवठा व्यवस्था आणि आजार निवारण:
– अल्लीटोला आणि तालुक्याच्या इतर गावातील पाणीपुरवठा स्वच्छ करण्यासाठी नियमितपणे ब्लिचिंग पावडर वापरण्यास बंधनकारक करावे. यापुढे ब्लिचिंग पावडर न वापरल्यास, संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.
– फॉगर मशीनच्या योग्य वापराबाबत स्थानिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रसार थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
6. गोटुलची उभारणी:
– नवेझरी गावातील रहिवाशांच्या गोटुल उभारणीच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करावी व त्यासाठी आवश्यक ते निधी आणि संसाधन पुरवावे.
– वनजमिनींच्या पट्ट्यांची योग्य प्रकरणे तपासून मंजुरी दिली जावी.
7. ग्रामसेवकांच्या कार्यक्षमता वाढवणे:
– मरकेकसा गावात आणि कोरची तालुक्यातील इतर गावांमध्ये निष्क्रिय ग्रामसेवकांच्या जागी जबाबदार आणि कर्तव्यदक्ष ग्रामसेवकांची नियुक्ती करावी.
– ग्रामसेवकांच्या कामकाजाची नियमित तपासणी करण्यात यावी व शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सहज मिळवून देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.
8. घरकुल योजना अंमलबजावणी:
– भीमपूर गावातील एनटी (विमुक्त जाती) समुदायाच्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
डॉ. शिलू चीमुरकर यांनी तहसिलदार साहेबांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रशासनातील विविध विभागांना तात्काळ कार्यवाही करण्यास सूचना द्याव्यात. प्रशासनाने आठ दिवसांच्या आत या समस्या सोडवल्या नाहीत तर 19 सप्टेंबर 2024 रोजी जन आक्रोश मोर्चा व घेराव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आह