कोरची
कोरची तालुक्यातील कोटगूल येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन करण्यात आले. कोरचीपासून ४० कि. मी अंतरावर असलेल्या कोटगूल येथे बी. एम. सी. सोशल वेलफेयर सोसायटी नागपूर यांच्यातर्फे संचालित सेंद्रीय शेती प्रकल्पाद्वारा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुख्य मार्गदर्शक म्हणून बी. एम. सी. सोशल वेलफेयर सोसायटी नागपूरचे संचालक भिमराव मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कृषी विभागाचे ज्ञानेश्वर मसराम, अध्यक्षस्थानी पोलिस मदत केंद्रातील सुरज पवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून रजनी वासनीक, पंचायत समिती माजी सभापती श्रावणकुमार मातलाम, कोटगुलच्या सरपंचा मंजुषा कुमरे, कृषी सहाय्यक मडावी, अनुराग डोलेकर, मनोज बनपूरकर, सतीश जापलवार, चंद्रशेखर साखरे, गिरीधर चलाख, पार्वता मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कोरची तालुक्यातील कोटगूल परिसर रोजगार विरहित असल्याने येथील नागरिकांना प्राधान्याने शेतीवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पध्दतीला बगल देवून सेंद्रीय शेतीची कास धरावी व शेतीतून भरघोस उत्पन्न घ्यावे, असे आवाहन मान्यवरांनी केला. कार्यक्रमाचे संचालन मधूसुदन नैताम, प्रास्ताविक सुरेंद्र बेसरा, तर आभार प्रदर्शन पार्वता मडावी यांनी मानले. या मेळाव्याला कोटगुल व परिसरातील महिला, पुरूष, नागरिक व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.