कोरची
अनुसूचित जाती व नवबौद्ध तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यान्वित आहे. स्वयंरोजगारामुळे कमकुवत घटनांमध्ये आत्मनिर्भरता आणि अभिमानाची भावना निर्माण होईल. मध्यमवर्गीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. सामाजिक न्याय व सबलीकरण हे घटनात्मक समतेचे अनुकरणीय मॉडेल बनू शकेल. या संकल्पनेने जिल्ह्यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ तर्फे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करणे हा मुख्य हेतू आहे त्याचप्रमाणे युवकांना स्वयंरोजगाराकरिता आर्थिक मदत या मंडळाच्या माध्यमातून पुरविले जात आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर व्यवसाया करिता कर्जाचा लाभ दिला जात आहे.
दिनांक २६ मार्च -२०२३ बुधवारला कोरची येथे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, गडचिरोली तर्फे “प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम” आयोजित करण्यात आले होते. जे. एन. देवकाते, प्रादेशिक व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, नागपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्रादेशिक व्यवस्थापक, जे. एन. देवकाते, यांनी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित केले. प्रशिक्षणानंतर जास्तीतजास्त लोकांना व्यवसाया करिता कर्जाचा लाभ दिला जाईल त्याकरिता जास्तीत जास्त लोकांनी कर्जाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा. असे आव्हान सुद्धा केले. सोबत एएसएससीआय या प्रशिक्षण संस्थेकडून उपस्थित विकास नायडू सर व सिद्धार्थ खोब्रागडे सर, जिल्हा व्यवस्थापक, वसुली विभाग नागपुर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना एम. डी. बारमासे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ गडचिरोली यांनी केली. तर कार्यक्रमाचे संचालन अविनाश हुमणे, संचालक विज़डम कम्प्यूटर इन्स्टिट्यूट कोरची यांनी केले. यावेळी प्रणव डाबरे, साईनाथ जेंगठे, पुरुषोत्तम कस्तूरे, आशिष हुमणे तसेच बहुसंख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.