कोरची
कोरची : येथील गुरुवारच्या आठवडी बाजारात टमाटरचे दर पेट्रोलच्या दरापेक्षाही वाढले. एक किलो टमाटर आता १२० रुपये किलो झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडले आहे. इतर भाजीपाल्याचे दरही शंभर रुपयांवर पोहोचले आहेत.
पूर्वी चारशे रुपयांमध्ये आठवडी बाजारातून पूर्ण थैली भरून भाजीपाला घरी यायचा. तीच थैली आठशे ते हजार रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे सर्वसाधारण मजुरी करणाऱ्या नागरिकांना भाजीपाला खाणे कठीण झाले आहे. हातावर पोट भरणारे नागरिक भाजीपाल्याचे दर वाढल्याने हिरवा भाजीपाला खाण्यापेक्षा कडधान्याकडे वळले आहेत. काही नागरिकांनी उन्हाळ्यात वाळू घातलेल्या वालाच्या शेंगा, वांगे, सुरुंग कांदा यांचा खुला खाण्यास सुरुवात केली आहे.
आठवडी बाजारामध्ये टमाटर १२० रुपये प्रतिकिलो, तर गुजरीमध्ये आज १५० रुपये किलो विकले जात आहे. हिरवी मिरची १५० रुपये किलो अद्रक २८० रुपये किलो, वालाच्या शेंगा १६० रुपये किलो, काळली १२० रुपये किलो, लसूण २०० रुपये किलो, कोथिंबीर २४० रुपये किलो, पत्तागोबी, लवकी, वांगी, भोपळा यांची विक्री ४० रुपये किलो दराने केली जात आहे.
कोट-
टमाटरची चटणी आठ दिवसांत तीन ते चार वेळा बनवीत होती; पण दर १२० ते १५० रुपये किलो झाल्यामुळे त्याची चटणी खाणे बंद झाले आहे. वालाच्या शेंगा, वांगे, सुरुंगाच्या खुला भाजीत खाणे सुरू केले आहे. टोमॅटोचे दर कमी होण्याची प्रतीक्षा आहे.
नितू भुवन कालियारी, गृहिणी.
एक किलो टमाटर आठवड्याभरासाठी लागतात. आठवडी बाजारात टमाटर १२० रुपये किलो झाल्याने अर्धाच किलो टमाटर घेऊन यावे लागले. यासह हिरवी मिरची १५० रुपये किलो झाली. ती एकपाव घेणे कठीण झाले आहे.
कशीश रफिकखा पठाण, गृहिणी.
देसाईगंज बाजारपेठेतून मोठ्या व्यापायाकडून टमाटर तीन हजार रुपये प्रतिकॅरेट घ्यावे लागत असल्यामुळे मला १५० रुपये किलोप्रमाणे बाजारात टमाटर विकावे लागत आहे. एक आठवड्यापूर्वी टमाटर ६० रुपये किलो होते.
वंदना मनिराम मोहर्ले, भाजीपाला विक्रेती
दोन दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले. त्यामुळेच बाजारात भाव वाढले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मात्र या कालावधीत टमाटरचे फारसे उत्पादन घेतले जात नाही. ते बाहेरूनच आणावे लागते.
प्रमिला डोमाजी गुरनुले, भाजीपाला शेतकरी