महिलेचा विनयभंग प्रकरणात बोरी येथील एका खाजगी डॉक्टराला अटक

 

 

कोरची

कोरची मुख्यालयापासून १३ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या बोरी गावातील एका खाजगी डॉक्टरांनी महिलेचा विनयभंग केल्यामुळे पीडित महिलेने या प्रकरणात बेडगाव पोलिस मदत केंद्रात तक्रार दाखल केल्यानंतर त्या आरोपी डॉक्टरला पोलिसांनी २० सप्टेंबर ला अटक केली आहे.

सुभाष हरप्रसाद बिश्वास (वय ४७) खाजगी डॉक्टर रा. बोरी, ता. कोरची असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला आठवडी बाजार करणारी व्यापारी आहे. ही महिला १६ सप्टेंबरला बोरी येथील आठवडी बाजारात स्वतःचे दुकान लावल्यानंतर सोबत असलेला लहान बाळ झोपेसाठी त्रास देत असल्यामुळे जवळच खाजगी दवाखान्यातील आरोपी डॉक्टर सुभाष बिश्वास हा ओळखीचा असल्यामुळे त्याला विचारून त्याच्या घरी मुलाला झोपविले होते. काही वेळानंतर डॉक्टरांनी महिलेला आवाज देऊन तुमचा बाळ झोपेतून उठल्याचे सांगितले तेव्हा महिला घरी एकटी आल्याचे बघून तिच्यावर शुभाषने अतिप्रसंग करून तिचा विनयभंग केला.

सदर प्रकरणात आरोपी सुभाष बिश्वास याच्या विरोधात बेडगाव पोलीस मदत केंद्र येथे 354, 354 (ब) भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचे तपास गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल बासू, कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, कोरची पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव पोलीस अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी हे करीत आहेत.