येत्या आठ दिवसात १२ तास वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार उपमुख्यमंत्र्यांचे उर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना निर्देश शेतकऱ्यांनी निराश न होता संयम बाळगण्याचे आमदार गजबे यांचे आवाहन

 

देसाईगंज-
खरीप हंगाम-२०२२ मध्ये नैसर्गिक आपत्ती व रोगराईमुळे नापिकी आल्याने झालेली नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली आहे. माञ करण्यात येत असलेल्या आठ तास वीज पुरवठ्यामुळे धान पिक धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता आमदार गजबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केलेल्या आग्रही मागणीमुळे उर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना तत्काळ आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले असल्याने येत आठ दिवसात लोडशेडिंग बंद करून दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान उद्भवलेली स्थिती व सणासुदीच्या काळात निर्णय घेण्यास विलंब झाला असला तरी धान उत्पादक शेतकऱ्यांनी निराश न होता संयम बाळगण्याचे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन केले आहे.आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यात उन्हाळी धान पिक उत्पादक शेतकऱ्यांचे लोडशेडिंग मुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आमदार गजबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे जंगल परिसरात वाघाची दहशत,कृषी पंपाना राञी ८ तास करण्यात येत असलेला वीज पुरवठा,यामुळे निर्माण झालेली स्थिती याबाबत वस्तुस्थिती मांडुन लोडशेडिंग बंद करून दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याची पोटतिडकिने मागणी केली.
आमदार गजबे यांच्या मागणीच्या अनुषंगाने २ मार्च रोजी महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्याप्रमाणे महावितरण कंपनीने ३ मार्च रोजी १२ तास वीज पुरवठ्यासाठी लागणारी वीज व त्यावरील येणाऱ्या एकुण खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला.माञ मध्यंतरी आलेल्या होळी सणाच्या सुट्ट्या व अर्थसंकल्प मांडण्यात वेळ गेल्याने ११ मार्च रोजी उपमुख्यमंत्र्यांनी कंपनीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करून उर्जा विभागाचे प्रधान सचिव यांना यथाशिघ्र आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहेत.
गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असुन येथील नागरिकांचे जीवनमान पुर्णता शेती व्यवसायावर अवलंबून आहे.उपलब्ध सिंचन सुविधे करीता किमान १२ तास वीज पुरवठा करणे अत्यावश्यक असताना राञी ८ तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याने शेतशिवार परिसरात वाघाची भिती व ८ तासात जमिनीतील पाणी जमिनीतच मुरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येऊ लागल्याने पिके करपण्याच्या भितीने शेतकरी आक्रमक होऊ लागले होते.ही गंभीर बाब आमदार गजबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणुन देऊन सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर लोडशेडिंग बंद करून दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याचे आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले असल्याने येत्या आठ दिवसात समस्या मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.तथापी शेतकऱ्यांनी निराश न होता संयम बाळगण्याचे आवाहन आमदार गजबे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन केले आहे.