अन्यथा विरोधात देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाला घेराव आंदोलनदे
देसाईगंज तालुका काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
देसाईगंज-
अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या देसाईगंज शहराच्या नगर भुमापनासाठी येथील नगर परिषदेच्या वतीने जवळपास ८० टक्के रक्कम शासन जमा करण्यात आली आहे.असे असताना नगर भुमापनाचे काम पुर्ण करून अद्यापही येथील रहिवाशांना आखीव पञीका देण्यात आल्या नसल्याने गेली कित्येक वर्षांपासून येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहु जाता नगर भुमापनाचे काम तत्काळ पुर्ण करून आखीव पञीका देण्यात यावी,अन्यथा या विरोधात देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येईल व दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतिने छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
गरजू व पाञ लाभार्थ्यांना पक्के घर उपलब्ध करून देता यावे यास्तव शासकीय स्तरावरुन प्रधानमंञी आवास योजना,रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना यासह विविध योजना राबविल्या जात आहेत.या योजनांचा लाभ गरजुना देता यावा यासाठी येथील नगर प्रशासनाने शहराचे सिटी सर्व्हे करुन अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्या संदर्भात नगर परिषदेच्या मान्यतेने देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाच्या पञानुसार भुमापन कामासाठी ३ कोटी ४८ लाख रुपयाची मागणी करण्यात आली असता देसाईगंज नगर परिषद कार्यालयाकडून ४ जानेवारी २०१८ रोजी २ कोटी ५० लाख,६ जुलै २०१८ ला ३ लाख तसेच १९ डिसेंबर २०१८ ला २५ लाख असे एकुण २ कोटी ७८ लाख रुपये देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयास अदा करण्यात आले आहेत.
अदा करण्यात आलेल्या रकमेची टक्केवारी एकुण मान्यताप्राप्त रकमेच्या ८० टक्के असुनही त्या प्रमाणात माञ अद्यापही नगर भुमापनाचे काम करण्यात आलेले नाही.यामुळे येथील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासुन वंचित राहावे लागत आहे. देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक असताना शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भुमापन करून सिमा निश्चित करण्यात आल्या नसल्याने शासकीय स्तरावरुन राबविण्यात येत असलेली घरकुल योजना रखडलेली आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज नगर भुमापनाचे काम तत्काळ पुर्ण करून आखीव पञीका देण्यात यावेत,अन्यथा विरोधात देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाला घेराव आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.
निवेदन गडचिरोली जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्विकारले.यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे, देसाईगंज शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष पिंकु बावणे,अनुसूचित जाती महिला विभागाच्या समिता नंदेश्वर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.