तालुका काँग्रेस कमिटीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
देसाईगंज –
नगरपरिषद क्षेत्रात कोट्यवधींची विकासकामे केली जातात. या विकासकामांतून शेकडो ब्रास मलबा उपलब्ध होतो. मात्र, कंत्राटदार त्याची परस्पर विल्हेवाट लावतात. त्यामुळे शहरातील समस्यांचे निराकरण होत नाही. शहरातील विकासकामांच्या मलब्यातून पांदण रस्ते व शहरातील खड्डेमय रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
देसाईगंज नगर परिषद अंतर्गत शहरात विविध निधीतून विकासकामे केली जातात. या विकासकामांतून रस्ते व नाल्यांच्या बांधकामातून शेकडो ब्रास मलबा, मुरुम उपलब्ध होतो. हा मलबा कंत्राटदार परस्पर विक्री करुन अथवा आपल्या इतर कामांत वापरतात. देसाईगंज शहरात शेतशिवारात जाणारे पांदन रस्ते व शहरातील रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासाठी या मलब्याचा वापर करण्यात यावा. यापूर्वी, तुळशी मार्गाकडे जाणाऱ्या नागमोती ते विपश्यना केंद्राकडे जाणारा शेतशिवारातिल पांदण रस्ता, विश तुकूम, जेजाणी राईसमिलचा पांदण रस्ता, तुकूम वॉर्डातील नहराकडे जाणारा रस्ता, आंबेडकर कॉलेजसमोरील रस्ता, शहराच्या मुख्य रस्त्यावरील खड्डे याची डागडुजी करावी. यासाठी नागरिकांनी वारंवार नगर प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले असून सध्या पावसाळा सुरू होण्याची वेळ आली. शेतकऱ्यांना शेतीवर जाताना त्रास होऊ नये व शहरातील नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये. यासाठी विकासकामांतील उपलब्ध मलब्यातून पांदन रस्ते व खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन नगरपरिषदचे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदन देताना तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, जि.प.च्या माजी सदस्या ममता पेंदाम, नरेंद्र गजपुरे, भीमराव नगराळे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष पंकज चहांदे, तालुका उपाध्यक्ष संजय करंकर, टिकाराम सहारे, डाकराम वाघमारे, माजी नगरसेवक आरिफ खानानी, अरुण कुंभलवार, विजय पिल्लेवान, गिरीधर कामथे, नरेश लिंगायत, सुजाता पिल्लेवान, रुपेश सुखदेवे, जगदीश धांडे, विमल मेश्राम, अल्का पिल्लेवान, ओंकार कामथे, यशोधरा मेश्राम, चेतन मेंढे, सचिन शेंडे, रजनी आत्राम आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.