कोरची तालुक्यात मलेरियाचे थैमान

कोटगुल परिसरात एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मलेरियाने मृत्यू. कोरची तालुक्यातील गोडरी येथील हृदयद्रावक घटना. 

कोरची.

इथून 30 किमी अंतरावर असलेल्या कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मलेरियाने थैमान घातले असून कोटगुल इथून जवळच असलेल्या गोडरी येथील एकाच कुटूंबातील दोन चिमुकल्यांचा मलेरियाने मृत्यू झाला आहे.मन हेलावणारी घटना मार्च महिन्यात घडली .करिष्मा अनिल नैताम वय 6 वर्षे आणि प्रमोद अनिल नैताम वय 4 वर्षे अशी मृत्यू पावलेल्या भावंडांची नाव आहेत.

या सख्या बहीण- भावाची तब्येत एकाएकी बिघडल्याने त्यांना तात्काळ 8 मार्चला गोडरी इथून जवळच असलेल्या कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दोघांनाही मलेरिया झाला होता.

 

कोटगूल येथील डॉक्टरांनी त्या भावंडांना ग्रामीण रुग्णालय कोरचीला रेफर केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या दोघांना त्याच दिवशी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले.

 

करिष्माची तब्येत अधिकच बिघडली त्यामुळे 9 मार्चला तिचा उपचारादरम्यान गडचिरोलीच्या सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला.

 

बिमार प्रमोदला नातेवाईकांसह दवाखान्यात ठेवून, करिष्माचा अंत्य संस्कार करण्यासाठी तिचे वडील आणि ईतर नातेवाईक तिला गोडरी या गावी घेऊन आले व अंत्यसंस्कार केले.

तिकडे मुलाची तब्येत बिघडत चालली होती. त्यामुळे सामान्य रूग्णालय गडचिरोलीच्या डॉक्टरांनी त्याला 10 मार्चला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर केले.

 

अनिल नैतामकडे मुलाला चंद्रपूर ला घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने बीमार मुलाला गावी आणण्याचा निर्णय घेतला. अशातच गावाकडे घेऊन येत असतांना वाटेतच प्रमोदचाही मृत्यू झाला.

 

अशाप्रकारे 9 मार्चला करिष्मा आणि 10 मार्चला प्रमोद या भावंडांचा मलेरियाने मृत्यू झाला. अनिलला दोनच अपत्य एक 6 वर्षाची मुलगी आणि 4 वर्षाचा मुलगा होता. हाता खांद्यावर खेळणाऱ्या दोन्ही मुलांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्याने त्यांच्या आईवडिलाची अवस्था कशी झाली असेल, याची कल्पना करणेच बरे.

 

या घटने संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी वृत्तपत्र प्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगूल ला भेट दिली तेव्हा तेथील आरोग्य केंद्रात काय सुरू आहे हे स्पष्ट झाले.त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पदाचा प्रभार मागील एक वर्षापासून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद मडावी यांचेकडे आहे. दोन्ही पदभार एकाच व्यक्तीकडे असल्याने त्या परिसरातील आरोग्य यंत्रणा बळकट असणे गरजेचे होते.डॉ.मडावी हे कोटगूल वरून 30 किमी अंतरावर असलेल्या कोरची या तालुक्याच्या ठिकाणी राहतात. आरोग्य केंद्रात डाक्टरांची कमतरता आहे.ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे,त्यापैकी बरेच कर्मचारी गैरहजर राहतात.डाॅ.नाकाडे हे तेथील ओपीडी आणि ईमरजेंसी रोग्यांवर औषधोपचार करतात. ईमरजेंसी रोग्यांवर औषधोपचार करण्यापेक्षा त्यांना रेफर करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. त्या केंद्रात पाच ते सहा गाड्या आहेत,ज्या जवळपासच्या गावात फिरण्यासाठी शासनाने दिल्या आहेत.परंतु कोणीही आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही.कारण वरील मुलांचा मृत्यू होण्याआधी एकही कर्मचारी त्या गावात फिरकला नाही असे गावकरी सांगतात.

 

कोटगूल वरून 4 किमी अंतरावर असलेल्या देऊळभट्टी ( पाटील टोला) येथील लता मुकेश कोरेटी (29) या महिलेला दिनांक 2होत15/5/2024 ला कोटगूल आरोग्य केंद्रात डिलीवरी साठी भरती केले असता, तिला तात्काळ रेफर करण्यात आले होते आणि तिची डिलीवरी रुग्णवाहिकेतच बेतकाठी- पांढरीगोटा च्या दरम्यान उबळखोबळ रस्त्यावर झाली होती. नशीब बलवत्तर होते म्हणून बाळ व माता बचावले.

या प्रकरणाची दखत घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी महिलेच्या गावी जाऊन चौकशी केली होती आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते.