कोरची
गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा मुख्यालयापासून जवळपास १५० किलोमीटर अंतरावर असलेले छत्तीसगड सीमेवरील आदिवासीबहुल गाव जैतानपार येथिल जिल्हा परिषद शाळा (प्राथमिक गट) आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक दिलीप रावजी नाकाडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३ मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय सचिव रंजीत सिंग देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते ०५ सप्टेंबरला शिक्षक दिनी शिल्ड देवून सत्कार करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२३ या वर्षा करिता गडचिरोली जिल्ह्यातील चार शिक्षकांची नियुक्ती झाली. त्यामध्ये कोरची तालुक्यातील शिक्षक दिलीप रावजी नाकाडे हे असून त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदन दिले जात आहे. नाकाडे शिक्षकांनी एक दिवस शाळेसाठी, आमच हॉस्पिटल, हिरवीगार शाळा, माझा स्वच्छतागृह, पैशाचे झाड, पुस्तकाचा दवाखाना, एक दिवस मुख्याध्यापक, तंबाखू मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त गाव, एक बी माझी, एक झाड लावू मित्रा, दप्तर मुक्त शनिवार, चला वाचूया गोष्टी, माझा कथासंग्रह, मेंदीच्या संगतीनं अध्यापन, फळ खाऊ आनंदाने, माझं गाव माझी शाळा अशा शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमासह जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, कर्तुत्वान शिक्षक पुरस्कार, खीके संस्थेकडून मानाचा पुरस्कार, सृष्टी या देश पातळीवरील संस्थेकडून प्राप्त पुरस्कार, जिल्हास्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार शिक्षक रत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारानी सन्मान प्राप्त केला आहे.
एम.ए. (शिक्षण शास्त्र) बी.एड पदवीधर शिक्षक दिलीप नाकाडे यांनी २३ वर्ष आठ महिने अतिदुर्गम, अति संवेदनशील क्षेत्रात कार्यरत राहून शिक्षण क्षेत्रात शासनाचे विविध उपक्रमासह गावात भरती पात्र विद्यार्थी नसतानाही बाहेर गावच्या विद्यार्थ्यांची शाळेत भरती व पटात वाढ याशिवाय कोरोना काळात शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमाद्वारे स्वतः व्हिडिओ निर्मिती करून अध्ययन अध्यापनात सातत्य असे अनेक उपक्रम केल्यामुळे त्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे. त्यांनी आपले यशाचे श्रेय कुटुंबीय मित्र मंडळ मार्गदर्शक गुरुजन व गावकरी तसेच विद्यार्थी यांना दिलेले आहे.