कोरची तालुक्यात रस्ते बांधकामांचा घोळ; अतिदुर्गम संवेदनशील गावामध्ये केवळ कागदावरच रस्ते निर्मित

 

 

कोरची

जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही रस्त्याची अवस्था जशास तसे असल्याचे चित्र दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात रस्ते बांधकामाचा घोळ पुढे आलं आहे. तालुक्यातील अनेक अतिदुर्गम नक्षली संवेदनशील गावामध्ये केवळ कागदोपत्रीच रस्ते निर्मिती होत आहे. दहा पेक्षा अधिक गावांमध्ये रस्ते केवळ कागदावरच बनवून बिले उचल केल्याचे आरोप होत आहे. काही गावांमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी तर काही गावांमध्ये ग्रामसेवकाचा पत्ता नसल्याचे गैरप्रकार करणाऱ्यांचे फावत आहे. वर्षानुवर्ष नागरिक स्वतः श्रमदान करून रस्ता बनवतात तर कंत्राटदार मात्र अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल लाटतात अशी स्थिती निर्माण आहे.

डाबरी ते पडयालजोब खडीकरण, पडयालजोब ते आंबेखारी, आंबेखारी फाटा ते आंबेखारी खडीकरण, मुरकुटी ते मयालघाट खडीकरण, नवेझरी ते लेकुरबोडी फाटा खडीकरण, लेकुरबोडी फाटा ते चरविदंड-काटेंगेटोला खडीकरण, काटेंगेटोला ते लक्ष्मीपूर खडीकरण अशा दहा पेक्षा अधिक गावातील कामाची अशी स्थिती आहे. ३० ते ४० वर्षे या गावांमध्ये रस्त्या दुरुस्तीची अथवा निर्मितीचे एकही कामे झाले नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. या रस्ते निर्मिती घोळाची तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील आणि आदिवासी बहुल जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात राज्य आणि केंद्र सरकारचे विकासाच्या संदर्भात संवेदनशील विकास कामे असते मात्र कोरची तालुक्यात येणाऱ्या निधीचा काम न करता उचल केल्या गेल्याचे येथील नागरिकांनी आरोप केले आहे. यासंदर्भात काही महिन्यापूर्वी कोरची तालुका आम आदमी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी सदर रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी कोरची तहसीलदारामार्फत गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी अभियंत्यांना निवेदन पाठवले होते. परंतु याकडे संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारची चौकशी करून दोषीवर कारवाई केल्याचे दिसून येत आहे.