कढोलिच्या आदिवासी विकास महामंडळाचे धान छत्तीसगड मार्गावर?

 

वाहतुक करतांना ट्रक फसल्याने पितळ उघड

 

कोरची-

हंगाम २०२३-२४ मधील सिएमआर मिलींग सुरु होताच मिलींग करीता जिल्ह्यातील काही राईसमिलर्सनी आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली यांचेशी अटी व शर्थिच्या अधिन राहुन करारनामा केला आहे.मात्र सदर राईसमिलर्स शासकीय धान खरेदी केंद्रावरुन उचल केलेल्या धानाची भरडाई न करता धान परस्पर परराज्यात विक्री करीता नेत असल्याचे एकंदरीत कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील आदिवासी विकास महामंडळाचा धान छत्तीसगडच्या मार्गावर वाहतुक करतांना ट्रक फसल्यामुळे पितळ उघडे पडल्याने तर्क वितर्काला चांगलेच उधाण आले आहे.

आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान खरेदी करून भरडाई करीता देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील देसाईगंज-आरमोरी मार्गावरील लहरी फॅक्टरी जवळील शुधित राईस इंडस्ट्रीजला भरडाई करीता देण्यात आले आहे.त्या अनुषंगाने कढोली येथील शासकीय धान खरेदी केंद्रावरुन ट्रक क्रमांक-सिजी ०७ सिबी-०४८७ मध्ये १७४० धानाच्या बॅग लोड करण्यात आल्या.भरडाई करीता केलेल्या करारनाम्यानुसार सदर ट्रक भरलेला धान घेऊन कुरुड येथील शुधित राईस इंडस्ट्रीजकडे यायला पाहिजे होता.मात्र उलटमार्गी छत्तीसगड राज्यात नेत असल्याचे फसलेल्या ट्रकमुळे उघडकीस आल्याने धान वाहतुक जिल्हा सोडून छत्तीसगड मार्गावर कशी ?यावरून तर्क वितर्काला चांगलेच उधाण आले आहे.

गडचिरोलीत जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावरुन उचल केलेला धान मागील दिड ते दोन महिण्यांपासुन कोरची मार्गे छत्तीसगडला नेत असल्याचे नाक्यावरील नोंदिवरून स्पष्ट झाले आहे.उचल केलेला धान भरडाई करुन तोच तांदुळ शासन जमा करणे अनिवार्य असतांना संबंधित राईसमिलर्स गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावरुन उचल केलेला धान भरडाई न करता छत्तीसगडला नेऊन विकत असल्याचे धक्कादायक वास्तव असतांना

आदिवासी विकास महामंडळाकडून मात्र या गंभीर तेवढ्याच धक्कादायक बाबीची अद्यापही दखल घेण्यात येत नसल्याने परस्पर धान विक्री करणाऱ्या राईसमिलर्सना संबंधित विभागाचीच तर मुक संमती नाही ना?असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान आतापर्यंत शासकीय धान खरेदी केंद्रावरुन उचल केलेला धान व संबंधित राईसमिल मध्ये उपलब्ध साठ्याची सखोल चौकशी केल्यास अनेक घबाड उघडकिस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असल्याने संबंधित विभागाचे अधिकारी याकरिता पुढाकार घेतील का?असा प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.

 

*प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर तत्काळ कायदेशीर कारवाई करा अन्यथा आंदोलन-छगन शेडमाके*

मागील दिड ते दोन महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावरुन धानाची उचल करून कोरची मार्गे छत्तीसगड राज्यात विक्रीसाठी बोगस पावत्या बनवून नेल्या जात आहेत.अटी व शर्थिच्या अधिन राहुन करारनामे करणारे राईसमिलर्स धानाची उचल करून तोच तांदुळ शासन जमा न करता रिसायकलिंग राशनचा निकृष्ठ तांदुळ शासन जमा करीत असल्याने जिल्ह्यातील आदिवासी गोरगरीबांना मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा सर्रास पुरवठा होत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता सदर प्रकरणाची यथाशिघ्र सखोल चौकशी करून दोषीवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा,अन्यथा विरोधात आदिवासी काँग्रेसच्या वतिने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव छगन शेडमाके यांनी दिला आहे.

 

कुरुडला येणारा ट्रक छत्तीसगडकडे का गेला,आपल्याला माहीत नाही-सहकारी संस्थेचे व्यवस्थापक पटने

या संदर्भात कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थेचे व्यवस्थापक पटने यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी ट्रक क्रमांक सिजी-०७ सिबी-०४८७ या ट्रक मध्ये कढोली धान खरेदी केंद्रावरुन आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली कडून देण्यात आलेल्या डिओप्रमाणे १७५० बॅग भरल्या.सदर ट्रक देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील शुधित राईस इंडस्ट्रीजला नेणे अपेक्षित होते.मात्र तसे न करता कोरची मार्गे छत्तीसगडकडे का नेण्यात आला हे आपल्याला माहित नसल्याची माहिती कढोली येथील आदिवासी विकास विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे व्यवस्थापक पटने यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली आहे.