जागतीक धम्म परिषदेकरिता डॉ. राजकुमार शेंडे श्रीलंकेला रवाना

 

 

आरमोरी… श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रिय बौद्ध धम्म परिषदेकरीता माजी प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे याना पाचारण करण्यात आले असुन आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपस्थित राहण्याकरिता डॉ. राजकुमार शेंडे रविवारी श्रीलंकेला रवाना झाले आहेत.

 

प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे हे गडचिरोली जिल्हयातील बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक म्हणुन ओळखले जातात.विदर्भात अनेक ठिकाणी झालेल्या बौद्ध धम्म परिषदेत सहभागी होऊन त्यांनी यापूर्वी धम्मावर मार्गदर्शन सुध्दा केले आहे. बुद्ध धम्मावरचे त्यांनी लिहिलेले अनेक लेख प्रमुख वृत्तपत्रात आजवर प्रकाशित झाले आहेत. बुध्द जयंतीला बिहार मधील बुद्धगया येथील महाबोधी विहाराला भेट दिली असता तेथे धम्मावर मार्गदर्शन करण्याची संधीही डॉ.राजकुमार शेंडे याना मिळाली होती.

 

बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने डॉ.राजकुमार शेंडे यांची अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनं समितीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी निवडही करण्यात आली आहे. दिनांक १३ फेब्रुवारीला श्रीलंकेतील कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषद होणार आहे. त्यात अनेक देशातील बौध्द भिक्खू व अभ्यासक सहभागी होणार आहेत.आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाल्याने डॉ. राजकुमार शेंडे हे रविवारी श्रीलंका दौऱ्यासाठी निघाले आहेत.